करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ जुलै रोजी संपत असून त्यानंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जातील असं सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“मी लॉकडाउन हा शब्द वापरत नाही आहे. मी याला अनलॉकडाउन असं म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. आपण सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलैनंतरचं धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. “निर्बंध शिथील होतील, तसंच राज्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. केंद्राच्या सूचनांवरच राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना अवलंबून असतील”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “केंद्र सरकार जीम, रेस्तराँ आणि स्विमिंग पूल सुरु करण्यासाटी परवानगी देईल असं वाटत नाही. तसंच शहर आणि ग्रामीण भागात बसेसनाही परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. शेवटी हा सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न आहे”.

करोना नियंत्रणासाठी प्रत्येक गावात दक्षता समिती- मुख्यमंत्री
करोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. करोना नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती गट स्थापन करण्याबरोबरच प्रत्येक गावात करोना दक्षता समित्या स्थापन करण्याचा मानस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.