राज्यावरील करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः केंद्र व राज्य सरकारनं लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं पाऊल टाकल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. मात्र, अनलॉकनंतर ती कमी होऊन दुसऱ्या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

राज्यात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला. त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्येही करोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरूवात झाली. विषाणू झपाट्यानं पसरत असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली. लॉकडाउनच्या काळात ४१ ते ५० आणि ५१ ते ६० या वयोगटातील व्यक्तींना करोना संसर्गाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे या वयोगटातील रुग्णसंख्याही जास्त होती.

केंद्रानं व राज्यानं लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात ३१ ते ४० वयोगटातील करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. सध्या राज्यात याच वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ३१ ते ४० वयोगटातील रुग्णसंख्या २१.३४ टक्के आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या माहितीप्रमाणे ४ जून रोजी या वयोगटातील रुग्णसंख्या २०.५४ टक्के इतकी होती. त्यानंतर ती वाढत गेली.

३१ ते ४० वयोगटानंतर राज्यात ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्येचा क्रमांक लागतो. या वयोगटातील रुग्णसंख्या १७.९ टक्के इतकी आहे. त्यानंतर २१ ते ३० या वयोगटातील रुग्णसंख्या १६.९८ टक्के इतकं आहे. तर ५१ ते ६० या वयोगटातील रुग्णांचं प्रमाण १५.९५ टक्के इतकं आहे.

“सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुरू झाल्या. आंतर जिल्हा प्रवासाला मुभा देण्यात आली. त्याचबरोबर कार्यालयं सुरू झाली. व्यावसायिक गोष्टींनाही परवानगी देण्यात आली. त्यामुळे ३१ ते ४० या वयोगटातील रुग्णांची संख्या अचानक वाढली. मागील काही महिन्यांत ही वाढ झाली आहे. कारण तरुणांना बाहेर पडू द्यायला हवं, तर ज्येष्ठ नागरिकांना घरी थांबू द्यावं, असा सामूहिक दृष्टिकोण झालेला आहे,” असं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यानं सांगितलं.