-प्रल्हाद बोरसे

करोनाचा उद्रेक झालेल्या मालेगावात आपत्कालीन व्यवस्थेचे नेतृत्व करणारे दस्तुरखुद्द आयुक्तच करोना बाधित झाल्याचे आढळून आल्याने जेवढी खळबळ उडाली होती,तेवढाच दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे. करोना बाधित झालेले आयुक्त चारच दिवसात करोनामुक्त झाल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आठ एप्रिल रोजी पहिल्यांदा करोना रुग्ण आढळून आलेल्या मालेगावात दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत शहर व तालुक्यात एकूण ६३३ जण करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तसेच ३७ जणांचा करोनाने बळी गेला आहे. करोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीचे व्यवस्थापन करताना महापालिका प्रशासनाला मोठीच जोखीम पत्करावी लागत आहे. अनेकदा अधिकारी,कर्मचाऱ्यांचा करोना बाधित रुग्णांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्क येत असतो. त्यामुळे यापूर्वी पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह काही कर्मचारी बाधित झाल्याचे निदर्शनास आले होते. तत्कालीन आयुक्त वैद्यकीय रजेवर गेल्याने पंधरा दिवसापूर्वी नव्याने बदलून आलेल्या आयुक्तांनी कोणताही त्रास नसताना केवळ खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या १२ मे रोजी करोना चाचणीसाठी स्त्राव नमुना दिला होता.

दुसऱ्या दिवशी १३ मे रोजी मालेगावात आलेले आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे शासकीय विश्रामगृहात करोना संदर्भात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेत असतानाच आयुक्त व सहय्यक आयुक्तदेखील करोनाबाधित असल्याचा अहवाल येऊन धडकला. त्यानंतर आयुक्त भर बैठकीतून बाहेर पडल्याने वस्तूस्थितीचा उलगडा झाल्यावर सर्वांनाच धक्का बसला. आयुक्त हे स्वत: करोना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातात. मात्र तेच करोना बाधित झाल्याने त्यांच्यावरच गृह विलगीकरण करवून घेण्याची विचित्र वेळ आली. अर्थात त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत तसेच कुठलाही त्रास नसल्याने शनिवारी त्यांनी पुन्हा चाचणी करुन घेतली. रात्री उशिरा या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात आयुक्त करोनामुक्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या सव्वा महिन्यापासून वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्वांनी धसका घेतला असताना गेली तीन-चार दिवस रुग्ण वाढीचा मंदावलेला वेग आणि दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचे वाढलेले लक्षणीय प्रमाण यामुळे  मालेगाव शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत मालेगावातील ४३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पाठोपाठ चारच दिवसांनी केलेल्या आयुक्तांच्या दुसऱ्या करोना चाचणीचा अहवाल आता नकारात्मक आल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे.