चीनमधील वहुना येथून जगभरात पसरत गेलेल्या करोना विषाणूमुळे साडेसहा हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्येही करोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या बुधवारी ४२ वर पोहचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही सरकारनं केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये मास्क आणि सॅनिटायझऱची मागणी वाढली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार करुन चढ्या दरात विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचबरोबर राज्य सरकारने एक अभिनव कल्पना राबवली असून यामुळे राज्यामध्ये मास्कचा तुटवडा निर्माण होणार नाही याबद्दल काळजी घेतली जात आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आता राज्यातील अनेक मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांकडून मास्क निर्मिती करुन घेतली आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत (डीजीआयपीआर) ट्विटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. डीजीआयपीआरने औपचारिक ट्विटवर हॅण्डलवरुन मास्क बनवणाऱ्या कैद्यांचा फोटो ट्विट केला आहे. “करोनाच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमधील बंद्यांद्वारे मास्क निर्मिती सुरू करण्यात आली आहे,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्राप्रमाणे केरळमध्येही कैद्यांकडून मास्क बनवून घेतले जात आहेत. राज्यामध्ये मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी चढ्या भावाने सॅनिटायझरची विक्री केली जात नाही ना याची प्रत्यक्षात पहाणी केली. शिंगणे यांनी मंगळवारी मुंबईतील मलाबार हिल परिसरातील तिनबत्ती चौक येथील केमिस्ट स्टोअरवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी उपलब्ध सॅनिटायजरमधील घटक योग्य असल्याचे तपासले. ग्राहकांच्या बिलावरील रक्कम एमआरपीपेक्षा जास्त नसल्याची खात्री शिंगणे यांनी करुन घेतली.

“सध्या सॅनिटायजर, मास्क यांची मागणी वाढली. ग्राहकांना मागणीनुसार हॅन्ड सॅनिटायजर, मास्क उपलब्ध करून द्या. ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या. आपल्या दुकानात मुबलक प्रमाणात चांगल्या दर्जाचे उत्पादन ठेवा, योग्य किंमतीतच ते विका,” अशा सूचनाही शिंगणे यांनी दुकानदारांना दिल्या आहेत.