राज्यातील करोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा काल एकाच दिवसांत चार हजारापेक्षा अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे प्रशासन काही कठोर पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषदेत तसा सूचक इशारा देखील दिला. नागिरकांनी मानसिकता तयार ठेवावी, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे विभागवार आढावा बैठका घेत आहेत. आज (सोमवार) औरंगाबाद येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

“जगातील अनेक देशांमध्ये कोरनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यांना लॉकडाउन करावं लागलं. आपल्यातील अनेकांना याबाबत गंभीरताच राहिलेली नाही, हे खरोखरच खूप काळजीचं आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांची सर्वांसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील. त्याबद्दलची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी.” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यातील जनतेला दिला आहे.

तसेच, “काही गोष्टींमध्ये आपण वेळीच निर्णय़ नाही घेतले, तर अडचणींना सामोरं जावं लागतं. ग्रामस्थ, नागरीक मास्क वापरण्याचा अजिबातच विचार करत नाहीत हे अतिशय घातक आहे. आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे, गंभीरतेने घ्यायला हवं.” असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.