महाराष्ट्रामधील सध्याची परिस्थिती ही राजकारण करण्याची नाहीय, असा टोला मनसेच्या पुण्यामधील नगरसेविका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी लगावला आहे. राज्य सरकार करोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही उपाययोजना करत आहेत त्याला सर्वपक्षीयांनी साथ दिली पाहिजे असं मत रुपली यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या काळामध्ये घाणेरडं राजकारण करत असेल, जाणून बुजून कोणी महाराष्ट्राला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची गाठ राज ठाकरेंशी ्असणार आहे हे लक्षात ठेवावं असा इशाराही रुपाली यांनी दिला आहे.
वांद्रे येथे स्थलांतरित कामगारांची गर्दी झाल्याच्या प्रकरणावर रुपाली यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “महाराष्ट्रामधील सध्याची परिस्थिती ही राजकारण करण्याची नाहीय. संपूर्ण देशासहीत महाराष्ट्र करोनाशी लढा देत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकार कर्तव्य म्हणून सामान्यांसाठी ज्या काही उपाययोजना करत आहेत त्याला सर्वपक्षीय प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली पाहिजे. प्रश्न हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील लोकांचा असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे,” असं आवाहन रुपाली यांनी केलं आहे.
वांद्रामधील घटनेबद्दल बोलताना रुपाली यांनी, झालं ते अंत्यंत दुर्देवी आहे असं सांगतानाच यावरुन राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. “सध्या लॉकडाउन झालेलं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे. अनेक व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत. सगळं काही बंद असताना अचानक ही लोकं येतात कुठून? कोणीतरी कुठेतरी राजकारणात सरकारला कात्रीत पकडण्यासाठी हे कारस्थान करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आणि घाणेरडं राजकारण आहे. सर्व पक्षाच्या लोकांनी आता सरकारला मदत केली पाहिजे असं वेळोवेळी सांगण्यात येत आहे. करोनावर सर्वांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे. असं असतानाही काही लोकं जाणून बुजून महाराष्ट्राला हानी पोहचवण्यासाठी जर हे कृत्य करत असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं त्यांची गाठ राज ठाकरे यांच्याशी असणार आहे. आमच्या महाराष्ट्राकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थ आहे,” अशा शब्दांमध्ये रुपाली यांनी राजकारण करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच रुपाली यांनी आपल्या फेसबुकवर राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करणारी पोस्ट टाकली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जुना फोटो शेअर केला होता. “मुख्यमंत्री साहेब चांगले काम करत आहेत पण जर महाराष्ट्रच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयत्न केलात तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरेआहे हे लक्षात ठेवा, ते विनंती नाही करत थेट जाळ काढतात,” अशी कॅप्शन या फोटोला रुपाली यांनी दिली होती.
गुरुवारी राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रसार माध्यमं आणि लोकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. लोकांच्या मनातील करोनाची भीती दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही सूचना केल्या आहेत. रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत याची आकडेवारी देणारं एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारनं जारी करावं, अशी सूचना राज यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 11:19 am