महाराष्ट्रात करोनाने थैमान घातलं असून मंगळवारी पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा १३८ वर पोहोचला असून महाराष्ट्रात सर्वात जास्त ४१ रुग्ण आहेत. एकीकडे राज्य सरकारने करोनाची लागण झालेल्यांची नाव जाहीर न करण्याचं आवाहन केलं असताना आता मनसेकडून नावं जाहीर केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे जनजागृती वाढेल असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की, “करोनाची लागण झालेले रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत. त्यांना एचआयव्हीसारख्या रोगाचीही लागण झालेली नाही. त्यांची नावं जाहीर केल्यास जनजागृती वाढेल. जी लोक करोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आली आहेत त्यांनाही माहिती मिळेल आणि जागरुक होतील”. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे अतिशय गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी करोनाची लागण झाल्याने एका कुटुंबावर गावाने बहिष्कार टाकल्याची घटना समोर आली होती. त्यांच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर त्यांनी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे तक्रार केली होती. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत करोनाची लागण झालेल्यांची नावं जाहीर न करण्याचं आवाहन करताना, नावं जाहीर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता.

पुण्यात दुसऱ्या एका घटनेत मलेशियाला फिरायला गेलेल्या कुटुंबाला सोसायटीत प्रवेश देऊ नये यासाठी सोसायटीधारकांनी पोलीस स्टेशन गाठलं होतं. पण पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. संदीप देशपांडे यांनी मात्र नावं जाहीर केल्यानंतर कोणीही त्यांना वाळीत टाकणार नाही, आपला समाज यातून सकारात्मकच भूमिका घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे.