मुंबई आणि महाराष्ट्रात एकेकाळी करोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून यामध्ये सातत्यानं घट होताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या करोनाविरोधातील प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दररोज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून येत आहे. केवळ ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी पाहिली तर नव्या रुग्णांच्या तुलनेत १३ हजार १०२ अधिक रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत १ लाख १० हजार ५९२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर या दरम्यान, १ लाख २३ हजार ६९४ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली. करोनातून रुग्ण बरे होण्याचा दरही आता ८१.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गुरूवारी महाराष्ट्रात १३ हजार ३९५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १५ हजार ५७५ जणांनी करोनावर मात केली. काही दिवसांपूर्वी करोनाचं केंद्र बनलेल्या मुंबईत आता रुग्ण वेगानं बरे होत आहे. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दरही ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील अनेक भागांपेक्षा मुंबईत लोकसंख्या अधिक आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण असतानाही सातत्यानं रुग्णसंख्येत घट होत आहे. दरम्यान, वेळेत रुग्णांची ओळख पटवण्यासाठी मुंबईसह राज्यांमध्ये करोनाच्या चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे.

मुंबईत दररोज १५ हजार चाचण्या

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार एकेकाळी मुंबईत ५ हजार चाचण्या करण्यात येत होत्या त्यावेळी नव्या १ हजार ते १ हजार २०० रुग्णांची नोंद होत होती. तर दुसरीकडे आता दररोज १५ हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून त्यातून दररोज २ हजार ते २ हजार २०० नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या मते लोकं आता सोशल डिस्टन्सिंग, मास्क सारख्या अनेक बाबींचं पालन करत आहेत. परंतु काही जण अद्यापही निष्काळजीपणा करत आहेत, त्यामुळे करोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात वेळ लागत आहेत. तसंच यापासून बचावासाठी सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन होणं आवश्यक असल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

१४ लाख रुग्ण

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १४ लाख ९३ हजार ८८४ लोकांना करोनाची लागण झाली. त्यापैकी १२ लाख १२ हजार ०१६ लोकांनी म्हणजेच ८१.१३ टक्के लोकांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत २ लाख २२ हजार ७६१ रुग्णांपैकी १ लाख ८६ हजार ६७५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ७४ लाख ४ हजार २३१ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून १४ लाख ९३ हजार ८८४ जणांची करोना अहवाल सकारात्मक आले. करोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानं २३ लाख ०९ हजार ५२५ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यापैकी २२ लाख ८४ हजार २०४ जणांना होम क्वारंटाइन तर २५ हजार ३२१ जणांना अन्य ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आलं आहे.