२६ ठिकाणी लसीकरण केंद्रे वाढवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न; ३५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : जिल्ह्यतील ३४ केंद्रांमधून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून ३५ हजार नागरिकांना लसीची पहिली मात्रा तर आठ हजारांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लस घेणे सोयीचे ठरावे म्हणून जिल्ह्यत आणखी २६ ठिकाणी लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.

सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागात १३ शासकीय व तीन खासगी तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात ११ शासकीय व सात खासगी केंद्रांवरून लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. आरोग्य कर्मचारी तसेच शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी  यांच्यापैकी सुमारे २९ हजारहुन अधिक कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस तर साडेआठ हजार कर्मचाऱ्यांनी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली आहे. जिल्ह्यतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील सहव्याधीने बाधित सुमारे सहा हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील १३ नवीन केंद्रांवर तसेच पालघर ग्रामीण भागातील १६ खासगी केंद्रावर लसीकरण सुरू करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.  या ठिकाणांची आवश्यक पाहणी केल्यानंतर या खासगी केंद्रांना लसीकरण सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले. त्या करिता पालघर व तालुक्यातील पाच, डहाणू, जव्हार व वसई तालुक्यातील प्रत्येकी चार, वाडा व विक्रमगड तालुक्यातील प्रत्येकी तीन, तलासरी तालुक्यात दोन तर मोखाडा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा एकूण २६ ठिकाणी लसीकरणाचे काम सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.  यामुळे जिल्ह्यत मुबलक प्रमाणात लसीकरण उपलब्ध होऊन त्याचा लाभ लसीकरणाच्या पुढील टप्प्यातदेखील होऊ शकेल.

राज्य शासनाने लसीकरणासाठी घोषित केलेल्या पहिल्या तीन टप्प्यात सुमारे अडीच लाख नागरिकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यापैकी लसीकरणाचा ५० हजारचा टप्पा जिल्ह्यतील पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. लसीकरणासाठी अधिकाधिक केंद्र उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.

लसीकरणासाठी विचाराधीन आरोग्य केंद्र

पालघर— सातपाटी, सफाळे, मासवण, माहीम, एडवण

डहाणू— चिंचणी, घोलवड, गंजाड, देहणे

जव्हार— साखरसेठ, जामसर, न्याहाळे खुर्द, गारद वाडी

वसई— आगाशी, निर्मळ, पारोळ, भातने

वाडा— कुडूस, गोऱ्हा, खानिवली

विक्रमगड— तलवाडा कुझ्रे, मालवाडा

तलासरी— उधवा आमगाव

मोखाडा— खोडाळा