करोनाच्या भीतीने अनेकजण आपला जीव धोक्यात घालून गावाच्या दिशेने निघाले आहेत. करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्याने लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही अनेकजण जीव धोक्यात घालून आपल्या खासगी गाडीने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अशाच पद्धतीने गावी निघालेल्या एका कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

येवला येथे हा भीषण कार अपघात झाला आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर झालेल्या या अपघातात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील पाच जण आपल्या गावी चालले होते. यावेळी कारचा टायर फुटला आणि कारवरील नियंत्रण सुटलं. यानंतर कार पुलावरुन जाऊन आदळली आणि भीषण अपघात झाला. अपघातात कारमध्ये असलेल्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.