राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. आव्हाड यांच्या संपर्कात असलेल्या १४ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आव्हाड यांच्यासहित अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं आहे. आव्हाड यांच्या संपर्कातील व्यक्तीला करोना झाल्याने आव्हाड यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आव्हाड यांना करोना झालेला नसल्याचे सिद्ध झालं.  असं असलं तरी आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे.

मुंबई मिररने ठाणे महानगरपालिकेच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एक वृत्तवाहिनीचा पत्रकार, त्याचा कॅमेरामॅन, तीन पोलिस शिपाई आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आले होते. एका पोलीस आधिकाऱ्याच्या संपर्कात आव्हाड आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळफास १४ जणांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाची करोना चाचणी पार पडली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा परिसरात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असून, या भागात आव्हाड यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू होते. तसेच तेथील पोलिसांशी संपर्क होता. मागील आठवड्यामध्ये आव्हाड हे पोलिसांबरोबर कळवा मुंब्रा परिसरामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना घराबाहेर न पडण्याचं आव्हान केलं होतं. याच दरम्यान पोलिसांना करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे.

आव्हाड यांना होम क्वारंटाइन केल्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करुन चौकशी केली आहे. मंगळवारी आव्हाड यांनीच फेसबुकवर एक पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली. “अचानक साहेबांचा फोन आला. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटलं सगळं ठिक आहे साहेब. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना? मी म्हटलं नाही साहेब. त्यांच्या आवाजामध्ये एक माया, आपलेपणा काळजी हे सगळ दिसत होतं, ” असा संवाद झाल्याचे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे लिहिताना आव्हाड म्हणतात, “सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ,” असा सल्लाही पवारांनी दिला.  आव्हाड यांनी पवारांना ८० हजार खिचडी वाटपाच काय करायच? असा सवाल विचारला असता त्यावर पावर काहीच बोलले नाही असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र गरीबाबद्दल शरद पवारांमधील तळमळ आम्ही ओळखुन आहोत, असंही आव्हाड यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

एक फोन आला आणि जादू झाली असं म्हणतानाच पोस्टच्या शेवटी आव्हाड लिहितात, “साहेब तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आता तर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही. तुमचेच संस्कार लोकांसाठी लढायचे. आशीर्वाद असावेत!”

आव्हाड यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील सर्वांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं असून सात दिवसांनंतर या सर्वांची पुन्हा चाचणी होणार आहे.