करोनाला रोखण्यासाठी बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यामुळे संपूर्ण बारामती शहर सील करण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी असणार आहे. बारामतीत गुरुवारी एका भाजी विक्रेत्याचा करोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील दोघांनाही करोनाची लागण झाली आहे. यासोबत बारामतीमधील करोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अजित पवार यांनी बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश दिला आहे.

बारामतीमधील भाजी विक्रेत्याला करोनाची लागण झाली होती. या भाजी विक्रेत्याचं गुरुवारी उपचारादरम्यान निधन झालं. भाजी विक्रेत्याच्या मुलगा आणि सुनेलाही करोनाची लगाण झाली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर प्रशासनाकडून कठोर पावलं उचलत पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. करोनाचा फैलाव वाढू नये यासाठी अजित पवार यांनी बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे  घरोघरी जाऊन सर्वच कुटुंबांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील लोकांची तीन वेळा तपासणी केली जाणार आहे.

तसंच सर्वत्र नाकाबंदी असून कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी असणार नाही. कोणीही बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जीवनाश्यक वस्तू लोकांना  घरपोच केल्या जाणार आहेत. नागरिकांना नियमाचं पालन करत भाजी, किराणा, औषध या वस्तू ऑर्डरप्रमाणे घरपोच केल्या जाणार आहेत. नागरिकांना प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर देण्यात आला असून यावरही कंट्रोल रुमची नजर असणार आहे. सोबतच एखाद्या कुटुंबात निधन झाल्यास कमीत कमी लोकांमध्ये अंत्यसंस्कार पार पाडण्याचा आदेश आहे.

आणखी वाचा- समजून घ्या… सहजपणे, करोनाच्या प्रतिबंधासाठीचे भिलवाडा प्रारूप

काय आहे भिलवाडा पॅटर्न –
राजस्थानमधील भिलवाडा येथे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची देशभरात चर्चा आहे. भिलवाडा येथे डॉक्टरला करोनाची लागण झाली होती. यानतंर करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली होती. त्यामुळे भिलवाडा येणाऱ्या दिवसांमध्ये करोनाचा हॉटस्पॉट होईल अशी चर्चा होती. येथील रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली होती. पण नंतर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत शहराच्या सीमा सील केल्या. सर्व हॉटेल्स आणि खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. प्रत्येक घरी जाऊन लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एक लाख लोकांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी वगळता इतर सर्वांना शहरात प्रवेश नाकारण्यात आला. लॉकडाउनच्या नियमांची कठोर अमलबजावणी करण्यात आली. ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. यामुळे ते लोक २४ तास पोलिसांच्या नजरेत होते. याशिवाय लोकांनीही सामाजिक अंतर पाळण्यावर भर दिला. प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एकत्रित प्रयत्नामुळे भिलवाडा येथे करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.