करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांची संचारबंदी लागू झाल्याने हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या ‘नाथ प्रतिष्ठान’च्या वतीने ५००० गरजूंना २१ दिवस पुरेल इतके किराणा सामान मोफत वाटप करण्यास सुरूवात केली आहे. परळी शहरतील विविध भागातुन गरजूंची यादी करण्यात आली असुन दारासमोर जाऊन सामान दिले जाणार आहे.

संचारबंदी लागू झाल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या परळी शहरात घरातून शासकीय कामं करत आहेत. तर संचारबंदीमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी नगरसेवक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्याकडून गरजू गरिबांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा लोकांना तांदूळ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चटणी, हळद असे साधारण २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप करण्याचा य निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय नियमांचे पालन करीत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना घरपोच शिधा सामान दिले जात आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवसात वाटप होणार आहे. नाथ प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, सचिव नितीन कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.

१६ निराधारांची घाटनांदूरच्या वृद्धाश्रमात रवानगी
परळी वैद्यनाथ देवस्थान परिसरात अनेक वयोवृद्ध, बेवारस निराधार, भिक्षुक लोक राहतात. संचारबंदीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेऊन धनंजय मुंडे या लोकांशी चर्चा करुन समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या पथकाने मार्फत १६ निराधारांना घाटनांदुर येथील वृद्धाश्रमात पाठवले. सुरुवातीला हे लोक जायला तयार नव्हते. पण समाजकल्याण आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्या टीमने मंत्री मुंडे यांना सांगितले. त्यानंतर मुंडे यांनी सर्वांशी संपर्क करुन त्यांना तयार केले.