करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत असताना दुसरीकडे लोकप्रतिनीधीदेखील आपापल्या मतदारसंघात लोकांची भेट घेत त्यांना घरीच थांबण्याचं आवाहन करत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील वारंवार कळवा-मुंब्रा येथील रहिवाशांना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या अशी विनंती करत आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी लोक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना घराबाहेर पडलात तर १४ दिवस जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली असल्याची ताकीद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. जितेंद्र आव्हाड यांनी स्पीकरच्या माध्यमातून यावेळी जानकी नगरमधील लोकांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी हे आम्हाला हौस म्हणून नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी करत असल्याचं सांगितलं आहे.

आणखी वाचा- हनुमान जयंतीला पर्वत आणायला जाऊ नका, घरातच थांबा – अजित पवार

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
“जर आपण त्याच्यावरुन जाणार असाल तर तुम्हाला १४ दिवसांसाठी जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे. माझ्या बंधू, भगिनींनो मी तुमचा जितेंद्र आव्हाड बोलतोय….मी स्वत: तुम्हाला समजावण्यासाठी जानकी नगरमध्ये आलो आहे. याच्यापुढे जानकी नगर पूर्णपणे सील करण्यात येईल आणि एकाही माणसाला घराबाहेर पडायला देणार नाही. हे आम्ही आमच्या हौसेखातर बोलत नाही आहोत. तुमचा जीव वाचवण्यासाठी करत आहोत. जरी तुम्हला तुमचा जीव प्यारा नसेल तरी मला प्यारा आहे. मी कोणालाही जानकी नगरमधून घराबाहेर पडू देणार नाही. पोलिसांची पूर्ण ताकद जानकी नगरमध्ये लावण्यात येईल आणि तुम्हाला घऱात बंद करण्यात येईल. कोणीही जास्त शहाणपणा करु नका. आपल्या जीवाशी खेळू नका, घरात लहान मुलं, बायको, आई-वडील आहेत. संसार उद्ध्वस्त करायचा असेल तर बाहेर या अन्यथा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही. मी जितेंद्र आव्हाड बोलतोय हे लक्षात ठेवा आणि मी जे बोलतोय ते तुम्हाला पाळावंच लागेल, हे लक्षात ठेवा,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus ncp jitendra awhad appeal people to stay home sgy
First published on: 07-04-2020 at 13:13 IST