दिल्लीत जे काही घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का ? त्यातून आपण काय परिस्थिती निर्माण करु पाहत आहोत. याचा विचार करण्याची वेळ आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी तबलिगी जमातच्या कार्यक्रमावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “खरं तर अशा परिस्थितीत कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. त्यांना परवानगी देण्याची गरज नव्हती. महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. पण आपल्याकडे ती परवानगी नाकारण्यात आली. दिल्लीतही महाराष्ट्राप्रमाणे परवानगी नाकारली असती तर टीव्हीवरुन वारंवार एखाद्या वर्गाला, समाजाच्या संबंधी एक चित्र मांडून सांप्रदायिक कलह वाढेल की काय अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे, ती संधी मिळाली नसती”.

आणखी वाचा- “अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका, ज्ञानाचा दिवा लावा”, शरद पवारांचं आवाहन

“या सगळ्या स्थितीत एकत्र राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत कटुता, संशय वाढेल अशी स्थिती निर्माण होऊ न देण्याची गरज आहे. मी टीव्हीवर जे काही पाहतो व्हॉट्सअपवर येणारे मेसेज चिंता निर्माण करणारे आहेत. काही मेसेजची तपासण केल्यानंतर लक्षात आलं की, पाच पैकी चार मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आणि वास्तव पुढं आलं तर वारंवार त्याची मांडणी करुन त्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज निर्माण केला जात आहे. हे कुणी मुद्दामून करत आहे का याबद्दल शंका वाटते,” असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

आणखी वाचा- तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

“सोलापुरात एका गावी बैलगाडा शर्यत पार पडली. असा सोहळा करायची गरज नव्हती. पण आनंद आहे की पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तो प्रकार तिथेच थांबला. तशी तत्परता दिल्लीत दाखवली असती तर आज जे पहायला मिळातंय ते पुन्हा पुन्हा पहायला मिळालं नसतं. दिल्लीत जे काही घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का ? त्यातून आपण काय परिस्थिती निर्माण करु पाहत आहोत. याचा विचार करण्याची वेळ आहे. जाणकार लोक याबद्दल खबरदारी घेतील,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.