देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याच्या सुचना देशातील सरकारी यंत्रणामार्फत दिल्या जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत औरंगाबादमध्ये मुस्लीम जोडप्याने एका आगळावेगळ्या पद्धतीने लग्न केलं.

औरंगाबादमधील मोहम्मद मिनहाजुद्द या तरुणाने बीडमधील तरुणीशी चक्क व्हिडिओ कॉलवरुन निकाह (लग्न) केलं. शुक्रवारी हा विवाहसोहळा पार पडला. देशामध्ये सुरु असणाऱ्या लॉकडाउनमुळे सर्व लग्नाचे हॉल बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेच अगदी साध्या पद्धतीने गाजावाज न करता दोन शहरांमध्ये वधू आणि वर उपस्थित असतानाच तंत्रज्ञानाच्या मदतीने हे लग्न लावण्यात आलं.

मुलीचे वडील मोहम्मद गाझी यांनी यासंदर्भात बोलताना लग्न सहा महिन्यापूर्वीच ठरल्याची माहिती दिली. “लग्नाची तारीख आम्ही सहा महिन्यापूर्वीच ठरवली होती. तेव्हा करोनाची कोणताही भीती जगातील कोणत्याच देशात नव्हती. ठरलेल्या तारखेलाच लग्न करण्यासाठी आम्ही आमच्या घरी कुटुंबातील वयस्करांच्या उपस्थितीमध्ये मोबाईलवरुन व्हिडिओ कॉलद्वारे मुलीचे लग्न लावून दिलं,” असं मोहम्मद यांनी सांगितलं.

हे लग्न लावणारे काझी मुफ्ती अनिस उल् रेमान यांनी दोन्हीकडील लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्याने आपण लग्न लावण्यास होकार दिल्याचे सांगितले. कमीन खर्चामध्ये हे लग्न लागल्याने दोन्ही कुटुंबाने आनंद व्यक्त केल्याचेही काझींनी सांगितले.