लॉकडाउनमध्ये देशातील जवळजवळ सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करु नये म्हणून अनेक ठिकाणी संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूरमध्येही याचा परिणाम जाणवत असून नागरिकांनी घरीच थांबून करोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला मदत करावी असं आवाहन महापालिकेमार्फत केलं जात आहे. एकीकडे लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भातील अंमलबजावणीसाठी शहरातील पोलीस यंत्रणा आणि प्रशासन काम करत असतानाच दुसरीकडे महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाउनचा फायदा घेत शहरातील नदी स्वच्छता अभियानाचा श्री गणेशा केला आहे. सामान्यपणे मे महिन्यात नागपूरमधील प्रमुख तीन नद्या स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र यंदा ही मोहिम मार्च महिन्यातच सुरु करण्यात आली आहे. शनिवारी पंचशील चौकात नागनदीमधून गाळ बाहेर काढत या मोहिमेला सुरुवात झाली. पुढील २० दिवसांमध्ये शहरातून जाणाऱ्या तीनही प्रमुख नद्यांची स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्रीची सोयही आयुक्तांनी करुन दिली आहे.

नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. या तिन्ही नद्यांची पुढील २० दिवसांच्या आत स्वच्छता केली जाणार नाही. नाग नदी शहरामधून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. या १७ किलोमीटरच्या अंतराची पाच टप्प्यांमध्ये स्वच्छता केली जाणार आहे. पिवळी नदीची चार टप्प्यांमध्ये तर पोरा नदीची तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता पुढील २० दिवसांत केली जाणार आहे. विशेष म्हणजे या साफसफाईच्या कामाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर देण्यात आली नसून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. शहरामध्ये एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या नद्या आहेत.

नक्की वाचा >> ‘घराबाहेर पडू नका’ हे नाशिककर ऐकेनात; विश्वास नांगरे-पाटील यांनी शोधला जालीम उपाय

दरवर्षी नागपूरमधील नदी स्वच्छता मोहिमेवरुन राजकारण केलं जातं त्यामुळेच आयुक्तांनी आता लॉकडाउनचा फायदा घेत नद्यांची स्वच्छता सालाबादप्रमाणे मे महिन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्याआधी करण्याऐवजी मार्चमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाचे प्रमुख तांत्रिक सल्लागार मो इसराईल असणार आहेत. तर समन्वय करण्याचे काम अधीक्षक अभियंता श्र्वेता बॅनर्जी आणि यांत्रिकी अभियंता उज्ज्वल लांजेवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

शहरातील नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली असून पंचशील चौकापासून अंबाझरीपर्यंत जाणाऱ्या नाग नदीच्या स्वच्छतेपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. नदीचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदी पात्रामधून घाण, कचरा आणि गाळ कढण्यात येणार आहे. काढलेला गाळ आणि कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावली जाणार असून हा गाळ नदीच्या बाजूला पडून राहणार नाही, अशी माहिती आयुक्त मुंढे यांनी दिली आहे.

नक्की पाहा >> Video: “सॅनिटायझर आणि मास्कची बिलकूल गरज नाही!”, तुकाराम मुंढेंनी सांगितल्या खास टीप्स

दरवर्षी, पावसाळ्याच्या काही दिवस आधी घाईघाईत नद्या साफ केल्या जायच्या. त्यानंतर काढलेला गाळ दुसऱ्या जागी हलवण्याआधीच पाऊस यायचा आणि गाळ पुन्हा नदीत जायचा. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी साचायचे. याच गोष्टी टाळण्यासाठी आता मार्चमध्येच नदी स्वच्छता मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. त्यामुळेच लॉकडाउननंतर जेव्हा नागपूरकर घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना शहरातील नद्यांचे वेगळेच रुप पहायला मिळेल.