जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचे रुग्ण भारतातील अनेक राज्यांमध्ये सापडले आहेत. भारतामधील करोनाग्रस्तांचा आकडा १४० च्या वर पोहचला आहे. राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ४२ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील करोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहान प्रशासनाने केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता माथेरानमध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही बंदी घालण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा आणि माथेरानचे मुख्याधिकाऱ्यांनी पत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.
रायगड जिल्ह्यामधील माथेरान हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथे मोठ्याप्रमाणात नागरिक पर्यटनासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होऊन करोना विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच माथेरानमध्ये होणारी पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी हा पर्यटकांना माथेरानमध्ये येण्यास बंदी घालण्याचा आदेश देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. या आदेशानुसार माथेनरामध्ये ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना जाता येणार नाही. या ठिकाणी कोणत्याही पर्यटकांनी येऊ नये असं प्रशासाने म्हटलं आहे. माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बापूराव भोई आणि नगाराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पर्यटकांवर बंदी घालण्यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
राज्यातील सर्व शाळांना तसेच शैक्षणिक संस्थाना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण मुंबई-पुण्यामधून आपल्या गावाकडे जातानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काहीजण पर्यटनस्थळांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच माथेरानमध्ये हे आदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 3:35 pm