करोनाचे भयसंकट वाढले असताना संचारबंदीतही मोकळ्या जागेत एकत्र गर्दी करून खेळणा-या तरूणांचे समुपदेशन करणे एका परिचारिकेसह तिच्या पतीच्या अंगलट आले. त्यानंतर या दाम्पत्याच्या दोन दुचाकी गाड्या अज्ञात समाजकंटकांनी जाळून टाकल्या. हा धक्कादायक प्रकार सोलापूरजवळील कॉम्रेड गोदूताई परूळेकर विडी घरकूल वसाहतीत घडला.

सुरेखा श्रीशैल पुजारी (वय ३०, रा. कॉम्रेड गोदूताई परूळेकर विडी घरकूल, कुंभारी) या सोलापुरातील एका सहकारी रूग्णालयात परिचारिकापदावर सेवेत आहेत. काल गुरूवारी सायंकाळी त्या आपले पती श्रीशैल यांच्या सोबत रूग्णालयाकडे कर्तव्य बजावण्यासाठी जात होत्या. तेव्हा विडी घरकूल परिसरात मोकळ्या जागेत काही तरूण मुले संचारबंदीतही एकत्र गर्दी करून खेळत होती. तेव्हा पुजारी दाम्पत्याने त्या तरूणांना हटकले आणि करोनाचा धोका वाढला असताना तुम्ही असे गर्दी करून खेळू नका, अशा शब्दात त्यांचे समुपदेशन केले. परंतु त्यामुळे समजून न घेता त्या तरूणांनी उलट पुजारी दाम्पत्यालाच धमकावले. तुम्ही रूग्णालयात नोकरी करता, तुमच्यामुळेच करोनाचा प्रसार होईल, तुम्हांला बघून घेतो, तुम्ही घरकुलात कसे राहता तेच बघतो, अशा शब्दात त्या उनाड तरूणांनी पुजारी दाम्पत्याला अवमानित करीत अक्षरशः हुसकावून लावले. याप्रकरणी लगेचच पुजारी दाम्पत्याने वळसंग पोलीस ठाणेअंकीत विडी घरकूल पोलीस चौकीत धाव घेऊन संबंधित तरूणांविरूध्द तक्रार केली. परंतु पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली नाही.

याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास पुजारी दाम्पत्याच्या घरासमोर लावलेल्या त्यांच्या दोन्ही दुचाकी गाड्यांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याने दोन्ही गाड्या जळाल्या. दरम्यान, या घटनेची माहिती कळविल्यानंतर वळसंग पोलीस घटनास्थळी धावून आले. संबंधित संशयितांविरूध्द कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.