राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एका दीड वर्षाच्या चिमुकल्याने करोनावर मात केली आहे. यशस्वी उपचारानंतर पुर्णपणे तंदुरुस्त झालेल्या या बाळास आज कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

अलिबागमधील उरण तालुक्यातील जासई येथील १८ महिन्याच्या मुलाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.  यानंतर त्याला १७ एप्रिलला नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १० दिवसांच्या उपचारानंतर हा मुलगा पुर्ण बरा झाला आहे. त्याची सोमवारी त्याची करोना चाचणी नकारात्मक आली. यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले.

यावेळी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, आणि उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यावेळी उपस्थित होते.  प्रशासनाने टाळ्या वाजवून या मुलाला घरी जाण्यासाठी निरोप दिला.

दरम्यान जिल्ह्यात सोमवारी पनवेल मनपा हद्दीत करोनाचा एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. मात्र दिलासा दायकबाब म्हणजे यातील ३० जण पूर्ण बरे झाले आहेत. सध्या ४५ जणांवर मुंबई, नवीमुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तीन जणांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे.