करोनामुळे राज्य सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीबरोबरच जीवनावश्यक वस्तू वगळून सर्वच गोष्टींच्या विक्रींना बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यासाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद केली आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असून, यासंदर्भात रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे.

राज्यात करोनाचा उपद्रव झाल्यानंतर राज्य सरकारनं टप्याटप्प्यानं बंधनं घालण्यास सुरूवात केली. मात्र, गर्दी कमी होत नसल्यानं सरकारनं संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतरही रस्त्यावर वाहने दिसत असल्यानं सरकारनं पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासंदर्भात पुर्नविचार करण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

आणखी वाचा- Coronavirus: लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगारांचा घराकडे पायी प्रवास

‘शेतकऱ्यांना भर उन्हात /रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतं. भाजीपाला, धान्य, चाऱ्याची वाहतूक, नांगरट व ट्रॅक्टरवरील मळणी यासाठीही डिझेल लागतं. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावं, ही विनंती,’ असा मुद्दा रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडं उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर ‘चालू साखर कारखान्यांनी आपल्या ऊसतोड कामगारांची आहे. तिथेच काळजी घ्यावी. तर गावाकडे निघालेल्या कामगारांना घरी परतण्यासाठी पोलिसांनी मदत करावी. याबाबत मी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही बोललो असून त्यांचंही याकडं बारकाईनं लक्ष आहे,’ अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

सध्या राज्यात ११९ जण करोना बाधित आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील आढळून आलेल्या पहिल्या रुग्णाला बुधवारी सुटी देण्यात आली. दुबईतून आलेल्या या दाम्पत्याला करोनाची लागण झाली होती.