औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना वेतन प्रतीक्षा

पालघर : महिन्याची ७ तारीख आली की हातात मिळणारे किंवा बँकेत जमा होणारे वेतनाला करोनाच्या प्रादुर्भावामुळे रोख बसण्याची भीती लाखो कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. ७ एप्रिल रोजी जरी काहींना वेतन मिळाले तर ती त्यांच्यासाठी दिलासादायक बाब असली तरी ज्यांना ते मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने महिनाभर उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील १४०० उद्योगांपैकी फक्त ६० ते ७० टक्के उद्योग सध्या कार्यरत आहेत. यासह जिल्ह्यात सुमारे साडेचार ते पाच हजार लघुउद्योग आहेत. या औद्योगिक क्षेत्रात लाखो कामगार काम करीत आहेत.  अनेक उद्योग हे २० ते २२ मार्चपासून बंद आहेत. १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी सुरू आहे. कामगारांनाच नव्हे तर  मालक वर्गालादेखील  कंपनीत जाणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत कामगारांच्या वेतनाचा हिशेब करणे तसेच बँकेत आरटीजीएस करण्यासाठी आवश्यक ते संगणकाचे काम करणे व व्यवहार करणे हे अशक्यप्राय झाले आहे. अनेक ठिकाणी लेखा विभागाचे काम प्रत्यक्षात कारखान्यात वा त्यांच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात  होत असल्याने सद्य:स्थितीत अशा दोन्ही ठिकाणी लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाहतूक बंद असल्याने पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे वेतन १ ते १० एप्रिलदरम्यान मिळण्याची शक्यता कमी असल्याचे व्यवस्थापन प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रोख रक्कम लागत असताना नागरिकांकडे बचत करून ठेवलेली रक्कम संपत आली आहे.

मुख्यमंत्री निधीला दोन कोटी

तारापूर येथील काही उद्योजकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैसे गोळा केले असून तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डी. के. राऊत यांनी दिली. याखेरीज काही उद्योजकांनी थेट पंतप्रधान मदतनिधीमध्येदेखील आपले योगदान दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. तारापूर येथील अनेक उद्योगांनी टाळेबंदीमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संच, तर इतरांनी तयार खिचडी पाकिटे वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे, असे सांगितले जात आहे.