शेकडो मैल पायपीट करूनही गावी आलेल्यांना रोजगाराचा प्रश्न कायम

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा :  करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यानंतर रोजगारासाठी स्थलांतरित झालेले पालघर जिल्ह्य़ातील अनेक मजूर शेकडो मैल पायपीट करून जरी माघारी परतले असले तरी त्यांचा रोजगाराचा प्रश्न हा कायम राहिला आहे. रोजगारच नाही तर  आमच्या चुली पेटणारच कशा अशा विवंचनेत सध्या हे मजूर गुरफटून गेले आहेत.

दरवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्य़ातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील मजुरांना  मुबलक रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते दरवर्षी शहरी भागात स्थलांतर होत असतात.

शहरी भागातील वीट उत्पादक, स्टोन क्रशरवाले तसेच अन्य लहान-मोठा व्यवसाय  करणारे लघुउद्योजक हे सुद्धा कधी दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर अशा अनेक नैसर्गिक संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडत असतात.  आता त्यांच्यापुढे करोनाचे  नवीन एक संकट  उभे राहिले आहे. या संकटाचा  सामना करण्यासाठी शासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतल्याने या मजुरांची उपासमार होऊ लागली आहे.

शासनाने गोरगरीब जनतेला तीन महिने धान्यवाटप करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्यापपर्यंत याचा लाभ या आदिवासींना मिळालेला नाही. जाहीर  केलेले मोफत धान्य तातडीने देण्याबाबत पावले उचलणे आवश्यक आहे. केवळ धान्य वाटप करून या गोरगरिबांच्या पोटाची खळगी भरणार नसून यासोबत तेल, मिरची, मीठ, हळद यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही देण्याची गरज आहे. अनेक आदिवासींकडे शिधापत्रिकाही नाही, विशेषत: कातकरी बांधव त्यापासून वंचित आहेत, त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना डावलण्यात येऊ  नये. तर पंचनामा करून त्यांनाही धान्यपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कातकरी समाजाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोविंद सवर यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

बाहर करोनाची भीती आणि घरात उपासमार

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी आलेल्या मजुरांचेही काम बंद झाले.  काही मजुरांनी  अनेक समस्यांना तोंड देत अक्षरश: पायपीट करत आपल्या गावांत दाखल झाले. मात्र येथे येऊनही पोटाची खळगी भरायची कशी, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. घरात धान्याचा कणही शिल्लक नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घराच्या बाहेर पडावे तर करोनाची भीती आणि घरात राहिलो तर उपासमार अशा दुहेरी कात्रित हे आदिवासी मजूर सापडले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.

वीट धंद्यावर कामासाठी गेलो होतो, परंतु काम अर्धवट सोडून निघून आल्याने मालकाकडून पुरेसे  पैसे मिळाले नाहीत. घरी हाताला काम नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

 – गोविंद नाकरा, शिलोत्तर, ता. वाडा

दारिद्रयरेषेखालील लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी  यांना तातडीने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यवाटप करण्यात येत आहे.

– उद्धव कदम, तहसीलदार, वाडा.

वीट धंद्यावर कामासाठी गेलो होतो, परंतु काम अर्धवट सोडून निघून आल्याने मालकाकडून पुरेसे  पैसे मिळाले नाहीत. घरी हाताला काम नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

 – गोविंद नाकरा, शिलोत्तर, ता. वाडा

दारिद्रयरेषेखालील लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी  यांना तातडीने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यवाटप करण्यात येत आहे.

– उद्धव कदम, तहसीलदार, वाडा.