देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. जून महिन्यात महाराष्ट्रात तब्बल एक लाख करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला करोनाबाधितांची रुग्णसंख्या १ लाख ८० हजार २९८ इतकी झाली आहे. राज्यात ९ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, तर १७ मार्च रोजी मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती.

१ जून रोजी राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७० हजार १३ इतकी होती. ३० जून रोजी ही संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली. म्हणजेच एका महिन्यात राज्यात एक लाखाहून अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे मुंबईबद्दल बोलायचं गेल्यास १ जून रोजी मुंबईतील करोनाबाधित रुग्णसंक्या ४१ हजार ९९ इतकी होती. ३० जून रोजी ही संख्या ७७ हजार ६५८ वर पोहोचली. एका महिन्यात मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येत ३६ हजार ५५९ इतकी वाढ नोंदवण्यात आली.

दरम्यान राज्यात बुधवारी ५ हजार ५३७ करोनाबाधित रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. “बुधवारी नवीन २ हजार २४३ करोनाबाधित रुग्ण बरे झाले. एकूण ९३ हजार १५४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली.