– निखिल मेस्त्री 

पालघर: सफाळे उसरणी परिसरातील करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सहवासात असलेले व संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर,नर्स अशा एकूण २९जणांचे नमूने नकारात्मक आले असल्याने गावातील नागरिकांसह आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.या सर्वांचे नमुने नकारात्मक आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

31 मार्च रोजी कोरोनाबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या वैद्यकीय अधिकारी परिचारिका यांच्यासह या व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेल्या 29 संशयीत व्यक्तीच्या घशांचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.दरम्यान या मृत कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या ठिकाणी चिंता व्यक्त केली जात होती.करोनाला घेऊन वेगवेगळ्या चर्चा या संपर्कातील व्यक्तीच्या बाबत होत होत्या.याचबरोबर मृत व्यक्तीला तपासलेले व उपचार केलेले आरोग्य अधिकारी,परिचारिका यांना घेऊन आरोग्य विभागही चिंतेत होता.मात्र या सर्वांचे नमुने अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आल्याने या सर्वांच्या करोनाबाधा चर्चेला पूर्णविराम मिळाला.तसेच गावातील व्यक्तींनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.कोरोनाबधित मृताच्या पत्नीला कोरनो लागण झाल्याने त्यांना आता ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.