लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : पालघर ग्रामीण जिल्ह्य़ातील करोना रुग्णांची संख्या १०३ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले असून ५२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तीन जणांचा करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे.

आठवडाअखेरीस पालघर तालुक्यात दहा, वसई ग्रामीणमध्ये सात, तर डहाणूमध्ये दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील १०३ रुग्णांपैकी पालघर तालुक्यात ४१, वसई ग्रामीणमध्ये ३७, डहाणूमध्ये १९, वाडय़ात पाच, जव्हारमध्ये एका रुग्णाचा समावेश आहे. जव्हार व वाडा येथील रुग्णसंख्या कायम असून सध्या जव्हारमधील एक वाडय़ात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर वसई ग्रामीणमधील २४, पालघरमधील अठरा, डहाणूमध्ये सात अशा एकंदर ५२ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या ६०३ वर पोहोचली असून महापालिका क्षेत्रातील २५ रुग्णांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे.