दीड वर्षीय चिमुकला, आठ वर्षीय मुलासह शहरात आणखी नऊ करोनाबाधित रुग्ण मंगळवारी आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १६८ झाली असून, आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. पाच जण पूर्ण बरे झाल्याने आज सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या १३५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात करोनाबाधित रुग्ण वाढीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी दिवसभरात आणखी नऊ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील एकूण ८१ तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. त्यापैकी ७२ अहवाल नकारात्मक, तर नऊ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १६८ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १९ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १३५ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार चार रुग्णांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला. त्यामध्ये एक दीड वर्षीय बालक, आठ वर्षीय मुलगा, ६२ वर्षीय व्यक्ती व २३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर सायंकाळीच्या अहवालात आणखी पाच रुग्ण वाढले. त्यामध्ये तीन महिला व दोन पुरुष आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातही मोठी वाढ झाली. प्रशासनाकडून करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

पाच जण करोनामुक्त

शहरातील पाच रुग्णांनी करोनावर मात केली. त्या पाच रुग्णांचे फेरतपासणीचे अहवाल नकारात्मक आल्याने मंगळवारी, सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. हे पाचही रुग्ण २८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाले होते.