बुधवारी राज्यात १७ हजार ४३३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे बुधवारी २९२ जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली. दरम्यान यानंतर राज्यातील उपचाराखाली असलेल्या करोनाबाधितांची संख्या २ लाखांच्यावर पोहोचली आहे. तर राज्यातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येनंही २५ हजारांचा टप्पा पार केला असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

बुधवारी राज्यात १७ हजार ४३३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर २९२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यात २ लाख १ हजार ७०३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत २५ हजार १९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच आज दिवसभरात १३ हजार ९५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ७२.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात ४२ लाख ८४ हजार करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८ लाख २५ हजार ७३९ करोना चाचण्या सकारात्मक आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

पुण्यात १६२७ नवे रुग्ण

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १ हजार ६२७ रुग्ण आढळले. त्यानंतर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९८ हजार ६९५ झाली आहे. तर आज दिवसभरात ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आतापर्यंत पुण्यात २ हजार ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात करोनावर उपचार घेणार्‍यांपैकी १ हजार ४०८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती पुणे पालिकेकडून देण्यात आली.