राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी नोंद होत होती. परंतु सोमवारी मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज राज्यात रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात १६ हजार ४२९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर १४ हजार ९२२ करोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संक्या आता ६ लाख ५९ हजार ३२२ इतकी झाला आहे. सध्या राज्यात एकूण २ लाख ३६ हजार ९३४ एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७१.३८ टक्के इतके झाले आहे.

राज्यात सोमवारी तब्बल ४२३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृतांची संख्या आता २७ हजार ०२७ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबईत सोमवारी १ हजार ७८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ५७ हजार ४१० वर गेली आहे. तर दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९ लाख २३ हजार ६४१ वर पोहोचली आहे.

आतापर्यंत मुंबईत १ लाख २५ हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २४ हजार १४४ रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. मुंबईत मृतांची एकूण संख्या ७ हजार ८९७ वर पोहोचली आहे.