मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीचा शुक्रवारी राजापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत व्यक्तीला काही काळ घरीच अलगीकरण करून  ठेवण्यात आले होते. त्याच्या स्वाबची चाचणी निगेटिव्ह  आली होती.

आता खबरदारीचा उपाय म्हणून करोनाबाधित मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्काराच्या पध्दतीने या व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राजापूरचे प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली आहे.

मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या एका प्रवाशाला करोना झाल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. त्याच्यावर सिंधुदुर्ग येथे उपचार करण्यात आले. दरम्यान हा रुग्ण संपर्कात आलेल्या लोकांना घरीच अलगीकरण करून  ठेवण्यात आले होते. संबंधित प्रवासी काही कालावधीसाठी खारेपाटण येथील आरोग्य केंद्रात गेल्याचे तपासणीत पुढे आले होते. नंतर तेथे घरी अलगीकरण करून ठेवलेल्या या व्यक्तीची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  अखेर शुक्रवारी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला.