खून प्रकरणातील करोना बाधित आरोपीने जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षातील बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्‍यांची नजर चुकवून बुधवारी पहाटे धुम ठोकली. करोना बाधित आरोपी पळून गेल्याने पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने दिवसभर प्रयत्न करुनही त्याचा ठिकाणा सापडला नाही. बाधित रुग्ण पळाल्याने प्रशासनाची झोप उडाली असून, हा आरोपी किती लोकांना बाधित करतो? याची धास्ती लागली आहे. तर मंगळवारी रात्री आलेल्या अहवालाने करोना बाधितांची संख्या ६३९ झाली आहे.

बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत घरोघरी तपासणी सुरू असल्याने दररोज करोना बाधितांचे मीटर वेगाने वाढू लागले आहे. मंगळवारी रात्री पर्यंत बाधितांचा आकडा ६३९ वर पोहोचला. तर जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात मागील सात दिवसांपासून उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या खून प्रकरणातील करोनाबाधित आरोपीने पोलिसांची नजर चुकवून धुम ठोकली. बाधित रुग्ण पळून गेल्याने पोलीस आणि आरोग्य विभाग हैराण झाला असून आता हा रुग्ण किती लोकांना बाधित करतो? यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बुधवारी दिवसभर बाधित आरोपी रुग्णाचा शोध घेतला तरी सायंकाळपर्यंत सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथील पुजार्‍याच्या हत्या प्रकरणात ईटकूर (ता.कळंब जि.उस्मानाबाद) येथील ५५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर २२ जुलै रोजी सदरील आरोपीची करोना तपासणी करण्यात आली. त्यात तो बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी असताना सदरील आरोपीने नजर चुकवून पळून जाण्यात यश मिळवल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.