करोना रुग्णसाबोतच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आहे, साताऱ्यातील कराड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यात संचारबंदी लागू असतानाही पाज जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र आणल्याने तसंच आदेशाचं उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेला हा रुग्ण तांबवे गावचा रहिवासी आहे. तो नुकताच मुंबईतून गावी गेला होता. यावेळी त्याने अनेक जणांची भेट घेतली होती. प्रशासनाकडून यासंबंधी माहिती घेतली जात असताना एक धक्कादायक माहिती समोर आली. रुग्णाने चाकुर्डी येथील नातेवाईकाच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याचं त्यांना कळालं.

गाव तलाठीने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आठ नातेवाईकांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी केला जात असून सर्वांना क्वारंटाइन होण्यासाठी सांगण्यात आलं आहे. राज्यात सध्या करोनाबाधितांची संख्या १०१८ झाली सून ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७७३ नवे रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या ५१९४ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. ४०१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.