लॉकडाउनच्या काळातही ग्रीन झोनमुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी यंत्रणा धडपडत असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यात एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने  चिंता वाढली आहे. मागील महिनाभरापासून ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल 37 दिवसांनंतर एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेकडून त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. वाहतूक व्यवसाय करणारा हा तरुण करमाळा, नवी मुंबई, वाशी आणि पुणे येथे टरबुज, खरबूज आणि पपई विक्रीसाठी घेऊन जात होता.

उमरगा तालुक्यातील तीन कोरोनाबाधीत रुग्ण महिनाभरापूर्वी उपचार घेऊन घरी परतले. त्यानंतर जिल्ह्यात एकही रुग्ण नव्याने आढळून आला नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला होता. तब्बल 37 दिवसांनी परंडा तालुक्यातील सरणवाडी गावातील तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा तपासणी अहवाल सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबादमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई-पुणे येथून परतल्यावर सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने या तरुणाने परंडा तालुक्यातील आसू येथील प्राथमिक उपचार केंद्रात जाऊन तपासणी केली. त्याला परंडा येथील कोविड नियंत्रण कक्षात जाऊन तपासणी करण्याबाबत सूचित करण्यात आले. मात्र तो दोन दिवस गावाकडे घरी जाऊन राहिला. त्रास वाढल्यानंतर त्याने परंडा येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथे त्याच्या स्वॅबचा नमुना घेऊन लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सोमवारी दुपारी या तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. गेल्या पावणेदोन महिन्यापासून प्रशासन, डॉक्टर्स, पोलीस आणि तमाम यंत्रणेचे आभार जनता व्यक्त करीत असताना पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे उस्मानाबादकरांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.