सोलापुरात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आता जिल्हा कारागृहातही पोहोचला असून बुधवारी कारागृहातील आणखी २८ कैदी व कर्मचारी करोनाबाधित आढळून आले. त्यामुळे तेथील रूग्णसंख्या ६४ झाली आहे. यात एका मृताचा समावेश आहे.
पाच्छा पेठेत असलेल्या जिल्हा कारागृहात करोनाबाधित पहिला रूग्ण २६ मे रोजी आढळून आला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी याच कारागृहातील एका कर्मचाऱ्यालाही करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर सजग झालेल्या प्रशासनाने कारागृहातील सर्व कैदी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता त्यातून धक्कादायक बाब समोर आली. २९ मे रोजी कारागृहातील ३४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. यात २६ कैदी आणि ८ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने कारागृह बदलून तात्पुरत्या स्वरूपात अक्कलकोट रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या विस्तीर्ण इमारतीमध्ये कारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. संशयित बाधित कैदी व कर्मचाऱ्यांसाठी तेथेच संस्थात्मक विलगीकरण कक्षही उभारण्यात आला आहे.
दरम्यान, सर्व कैदी आणि कर्मचाऱ्यांपैकी काहीजणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यात नवे २८ जण करोनाबाधित आढळून आल्याचा आणखी धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. यात कैद्यांची संख्या नेमकी किती, याचा तपशील कारागृह अधीक्षक डी. एस इगवे यांच्याकडे सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध नव्हता. नव्याने आढळून आलेल्या करोनाबाधित कैदी व कर्मचाऱ्यांसह कारागृहातील एकूण बाधितांची संख्या ६४ वर पोहोचली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 10:05 pm