निखिल मेस्त्री

मरणानंतरही मरणयातना याचा प्रत्यय सध्याच्या करोनाच्या वातावरणात पहायला मिळाला. करोनाच्या भीतीपोटी एका आदिवासी महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही गावकरी पुढे आला नाही. शेवटी सरपंच आणि काही तरुणांनी पुढाकार घेऊन तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ही घटना पालघर तालुक्यातील नांदगाव गावात घडली.

करोना हा महाभयंकर आजार असून त्याच्या तावडीत सापडल्यास वाचणे कठीण असल्याचा समज ग्रामीण भागात तयार झाला आहे. म्हणजेच प्रभावी जनजागृती नसल्याचा फटका या महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी जाणवला. करोनाविषयीची दहशत पालघरच्या ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईकही तयार होत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगाव ग्रामपंचायतीमधील पालवी पाड्यातील एक २८ वर्षीय आदिवासी महिला दीड वर्षांपासून रक्तशयाने पीडीत होती. मंगळवारी या महिलेचा भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मृत्यु झाला. आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर भिवंडीहून या महिलेचा मृतदेह शववहिनीतून नांदगाव येथे आणला. मात्र, सर्वत्र सुरू असलेल्या करोनाच्या भीतीपोटी हा मृतदेहही गावात आणण्यास पालवी पाड्यातील नागरिकांनी सुरुवातीला विरोध दर्शविला. त्यानंतर अनेक प्रयत्नांतून मृतदेह घरी आणला खरा, पण या महिलेच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक सोडून कोणीच आलं नाही.

अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू करताना नागरिकांच्या असहकाराने सरण मिळणे कठीण होऊन बसले होते. शेवटी या महिलेच्या पतीने पत्नीचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला. ही बाब गावचे सरपंच पवन सावरा यांना कळताच त्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेत सचिन डावरे, कैलास पवार आदी गावच्या तरुणांना एकत्र करत पीडित कुटुंबाला धीर दिला व अंत्यसंस्कार करण्याचा मार्ग मोकळा झाला. या तरुणानी एकत्र येत अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य गोळा करून सरणाची व्यवस्था केली. त्यानंतर हिंदू परंपरेनुसार मृतावर अंत्यसंस्कार केले गेले.

भीतीपोटी समाजबांधवांवर अन्याय करु नये

गावचे सरपंच पवन सावरा म्हणाले, “करोनामुळे गरिब आणि आदिवासींचे हाल सुरू आहेत. हातावर पोट असलेल्यांना अन्नपाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. मात्र, मरणानंतरही त्यांना मरणयातना सहन करावी लागते आहे, हे मोठे दुर्देव आहे. आजाराच्या भीतीपोटी आपल्याचा समाजबांधवावर असा अन्याय करू नये.”