अलिबाग- टाळेबंदीच्या २२ दिवसात रायगड पोलीसांनी तब्बल ५१ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ३ हजार ०३१ वाहने जप्त केली असून १७ हजार ७९५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी दुचाकी, चार चाकी आणि तीन चाकी वाहनांच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे. वाहनांना पेट्रोल आणि डिझेल पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची संख्या कमी झालेली नाही. हिबाब लक्षात घेऊन रायगड पोलीसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचाकांवर कारवाईचा बडगा उगारला.
मात्र ही कारवाई करतांना मारझोड करण्यापेक्षा पोलीसांनी दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. टाळेबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्यांना फटकवणाऱ्या पोलीसांच्या अनेक चित्रफीती समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्या. याकारवाईमुळे पोलीस दलावर टिकाही झाली. काही ठिकाणी पोलीसांनाच समाजकंटकांनी मारहाण केली. गाडी अडविणाऱ्या वाहतूक पोलीसाला गाडी सकट फरफटत नेल्याचा व्हिडीओही समोर आला. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पोलीसांनी प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाईचा अवलंब केला. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.

वाहने जप्त करणे, वाहनचाकलांकडून दंड वसूल करणे, यावर पोलीसांनी भर दिला. २२ दिवसात हि कारवाई निरंतर सुरु ठेवली. त्यामुळे रस्त्यावरची वाहनांची संख्या कमी होत गेली. या कारवाईतून पोलीसांनी तब्बल ५१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. एवढेच नव्हे तर संचारबंदीचे उल्लघन करून रस्त्यावर फिरणारी ३ हजार वाहनेही जप्त केली आहेत. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा नाहीतर घरीच थांबा, वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नका असे आवाहन पोलीसांकडून केले जात आहे.