मागील दीड महिन्यापासून नियुक्त करण्यात आलेले पोलीस थकलेले आहेत. पोलिसही अतिरिक्त कामामुळे तणावाखाली आहेत. सध्या रमजानचा काळ सुरु आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काहीजण पोलिसांना अगदीच गृहीत धरायला लागलेत. अशा ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) नेमणूक करावी, अशी सूचना आपण राज्य सरकारला केल्याचे माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

एसआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्याने पोलिसांना गृहीत धरल्या जाणाऱ्या भागांमध्ये दरारा निर्माण होऊन लोकं घाराबाहेर येणार नाहीत असं मतही राज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. सध्याचा काळ हा रमजानचा असून अनेक लोकं घराबाहेर येतायत. आपण अनेक सण घरामध्ये साजरे केले. मुस्लीम समाजाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. विचार होत नसेल तर अशा ठिकाणी अतिरिक्त फोर्स लावणे गरजेचे आहे असं मत राज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडलं. सर्व पक्षीय नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा- लॉकडाउन उठवण्यापासून ते रोजगारापर्यंत राज यांच्या ‘ठाकरे सरकार’ला १२ महत्वाच्या सूचना

काही दिवसांपूर्वीही राज यांनी व्यक्त केली होती नाराजी

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज यांनी राज्यातील लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन आणि पोलिसांकडून होत असलेल्या दुजाभावाबद्दल नाराजी घडपणे व्यक्त केली होती. “सुरूवातीच्या काळातील गोष्टी सोडल्या तर सध्या काही बरोबर चाललं आहे, असं मला दिसत नाही. सगळे जण बसून निर्णय घेतात आणि ते लोकांसमोर येतात असं चित्र मला तरी आता दिसत नाही. जी लोकं काही गोष्टी सांगत आहेत, त्या गोष्टी पटकन व्हायला हव्यात. जसं की दुकानं उघडी ठेवण्याबद्दल असेल. रमजान सुरू आहे. त्या सणासाठी सगळे रस्तेच्या रस्ते भरले आहेत. असं करून चालेल? त्यांच्या सणासाठी तुम्ही कोणतेही रस्ते भरून टाकणार, ते कसेही रस्त्यावर येणार आणि आम्ही लोकं रस्त्यावर आल्यावर त्यांना बांबू खायला लागणार, हे काही बरोबर नाही,” असं म्हणत राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

“ज्यावेळी अश्या प्रकारे संकट येतं त्यावेळी कोणत्याही प्रकारचा धर्म असता कामा नये. त्यावेळी सगळ्यांना समान न्याय आणि वागणूक असली पाहिजे. सगळ्यांना सगळ्यांचा धर्म आहेच की? आम्हाला नाही का आमचा धर्म? आमचे सण आणि उत्सव आम्ही घरामध्ये साजरे केले. अगदी १४ तारखेची आंबेडकर जयंती माझ्या दलित बांधवांनी घरामध्ये साजरी केली. सगळ्या धर्माची लोक आपापले सण उत्सव घरामध्ये साजरे करतायेत मग अशा ठराविक लोकांसाठी अशा गोष्टी का होतायेत?,” असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला होता.