महाराष्ट्रावर संकट आलेलं असताना परराज्यातील लोकं ज्या राज्यामध्ये पैसे कमवले त्या राज्याला संकटात टाकून आपल्या राज्यात जाण्याचा विचार करत असतील तर ते चुकीचं आहे, असं मत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ज्या राज्यामध्ये इतके वर्ष राहिले त्या राज्याचे न होता संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं परखड मत राज यांनी एका वृत्तवाहिनीला महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे.

देशभरामध्ये कोरनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या काळात अनेक लोकं वेगवेगळ्या राज्यामध्ये अडकून पडली आहेत. महाराष्ट्रामध्येही उत्तर प्रदेश, बिहारबरोबरच इतर राज्यामधील हजारो कामगार अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज यांना त्यांनी काही वर्षांपूर्वी परप्रांतीयांबद्दल बोलताना केलेल्या वक्तव्याची आठवण मुलाखतीमध्ये करुन देत प्रश्न विचारण्यात आला.  ‘ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट येईल तेव्हा परप्रांतीय मुंबईला सोडून आपल्या राज्यात निघून जातील असं तुम्ही म्हणाला होतात. तेच आता होताना दिसतयं का? असा सवाल राज यांना विचारण्यात आला. “महाराष्ट्रात राहून पैसे कमवले आणि संकट आल्यावर निघून जातात. आता हे लोकं निघून गेल्यावर यांची कामं कोण करणार. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे,” असं मत राज यांनी या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केलं.

परप्रांतीय कमी रोजंदारीत काम करता हा मुद्दा खोडून काढत मराठी मुलांना कामसंदर्भात माहितीच पुरवली जात नसल्याचे राज यांनी म्हटलं. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बघितलं की कळेल मुलं काम शोधतायत. आपण सांगतच नाही की कुठे आणि कोणतं काम आहेत. कामाबद्दलची माहिती या तरुणांपर्यंत पोहचत नाही. मराठी मुलं बिनकामाची आहेत असं नाही. पण काही गोष्टीमध्ये काही लोकांची खासियत असते. सुतारकाम राजस्थानी आणि मुस्लीमांना जमतं ते मराठी मुलांना जमेलच असं नाही. पण आहेत त्या कामांबद्दल तरी त्यांच्यापर्यंत माहिती पोहचली पाहिजे, असं मत राज यांनी व्यक्त केलं.

“परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊ नये असं माझं म्हणणं नाही. मात्र आधी मान खाली घालून येणार आणि नंतर मान वर करुन दादागिरी करणार हे चालणार नाही. खपवून घेतलं जाणार नाही. पैसे कमावायला येता याला माझा विरोध नाही. जगभरात सगळीकडेच अशी देवाघेवाण होतो. तुम्ही इतकी वर्षे आहात महाराष्ट्राचे तर महाराष्ट्राचे व्हा  इतकचं माझं म्हणणं आहे. संकटकाळी तुम्हाला तुमचं राज्यच आठवत असेल तर हे चूक आहे असं मी म्हणेल,” असं मत राज यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केलं. त्यावर ‘उत्तर प्रदेश बिहारमधली लोकांनी करोनाच्या काळात महाराष्ट्र सोडून जाऊ नये’ असं तुम्हाल म्हणायचं आहे का असा सवाल राज यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अर्थात, असं उत्तर देत, परराज्यातील लोकांनी परत जाऊ नये. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. संकटकाळात ज्या राज्याने तुम्हाला सर्व काही दिलं त्याला सोडून काय जाताय? असा सवाल परप्रांतीयांना केला आहे.

“मी आधीपासून हेच सांगत होतो महाराष्ट्राचे व्हा. मराठी व्हा. मराठी भाषा शिका. एवढं सगळं केल्यावर मराठी समाजावर दादागिरी होणार असेल तर मी ही सहन करणार नाही. मी त्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्या मेळाव्यामध्येही हीच भूमिका मांडली होती. मान खाली घालून येतात नंतर मान वर करतात ही गोष्ट चांगली नाही. ही खपवून घेतली जणार नाही,” असा इशाराही राज यांनी परप्रांतीयांना दिला आहे.