यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये करोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना नातेवाईकांकडून खर्रा आणि दारू पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

सुरक्षा रक्षकाने तपासणी केली असता करोना रुग्णांच्या नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा लपवून ठेवल्याचं समोर आलं. काही नातेवाईकांनी तर विदेशी मद्यसुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला होता. वैद्यकीय महाविद्यालयात तैनात सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांच्या सतर्कनेने हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. याच ठिकाणी असलेल्या रुग्णांची तलब भागविण्यासाठी नातेवाईकांनी हा अजब प्रकार केला.