रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या करोनाबाधित रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना न जुमानता नेऊन परस्पर अंत्यसंस्कार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. रत्नागिरी शहरातील राजिवडा येथील या रूग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. रविवारी रात्री त्याचे निधन झाल्याचे समजताच नातेवाईकांनी तेथे घुसून मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी तिथे उपस्थित परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विरोध केला असता सुमारे ३० ते ४० जणांच्या या समूहाने त्याकडे दुर्लक्ष करत मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार केले.

“जिल्हा शासकीय रूग्णालयात करोनाबाधित रूग्णांवर व्यवस्थित उपचार केले जात असताना गैरसमजातून हा प्रकार घडला. आम्ही नातेवाईकांना खूप समाजावण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने या समूहासमोर आम्हाला काही करता आले नाही,” असा खुलासा शासकीय रूग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या विचित्र घटनेमुळे रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने नातेवाईकांमधील गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.

करोनाबाधिताचा रूग्णालयात येण्यास नकार
दरम्यान,  रत्नागिरी शहरातील पठाणवाडी येथे करोनाबाधित रुग्णाला सोमवारी आणायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी रोखले. रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यावरून येथे प्रचंड तणाव झाला असून पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत हा पेच कायम होता.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी रविवारी रात्री गेले होते. मात्र, आम्ही उद्या सकाळी आपणहून त्याला रूग्णालयात आणून सोडतो, असे या रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. पण सोमवारी सकाळी पुन्हा आरोग्य कर्मचारी गेले असता आम्ही त्याला शासकीय रुग्णालयात पाठवणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगत येथील नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना रोखून धरले. यामुळे शहर पोलिस स्थानकातून जादा पोलीस कुमक मागवण्यात आली असून या रुग्णाला  दाखल करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.