चीन येथील वुहानमधून पसरलेल्या करोना विषाणू प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने करोनाला महामारी असं घोषित केलं आहे. भारतामध्येही करोनानं आपला प्रदुर्भाव दाखवण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात करोना विषाणू संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. करोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. करोना विषाणुंचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने ठोस पावले उचलली असताना त्याला पूरक साथ म्हणून सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एका महिन्याचे वेतन देण्याचे ठरविले आहे.

राज्यात करोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना त्याविषयी जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींसह राजकीय पुढारी स्वतः पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत असताना आमदार संजय शिंदे यांनी करोना विषाणू फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता स्वतःचे एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर करीत लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या परीने सहयोग देऊ केला आहे.

करोना विषाणू रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून आरोप रक्षणासाठी हे युद्ध समजून सामान्य जनतेनेही शासनाला सहकार्य करायला हवे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे संचारबंदी काळात कोणीही घराबाहेर पडू नये. करोना विषाणूचा धोका परकीय शत्रूपेक्षा जास्त वाटतो. त्याचे गांभीर्य सर्वांनीच घ्यायला हवे, असे मत आमदार संजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी अजून सहा जणांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं असून यासोबतच करोनाग्रस्तांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. यामध्ये मुंबईतील पाच जण आहेत. तर एक रुग्ण अहमदनगरचा आहे. सोमवारी ९७ वर पोहोचलेली संख्या आज संध्याकाळपर्यंत १०७ वर पोहोचली आहे.