रायगड जिल्ह्यातील सागरी सीमाही आता जलवाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईतून अनेक जण सागरी मार्गाने रायगड जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व मासेमारी तसेच प्रवासी बंदरांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतो आहे. त्यामुळे भयभित झालेले चाकरमानी मिळेल त्या मार्गाने कोकणात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. रस्ते महामार्ग बंद करण्यात आल्याने, अनेक जण रेल्वे मार्गावरून चालत अथवा मच्छीमार बोटींच्या मदतीने रायगड जिल्ह्यात दाखल होण्याचे प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मुंबईतील ससून डॉक आणि वरळी येथून मच्छीमार बोटींच्या साह्याने रायगड आणि नवी मुंबईत दाखल होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी सागरी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला.

टाळेबंदी काळात मासेमारीला निर्बंध नाहीत. त्यामुळे या बोटींचा वापर करून अलिबाग तालुक्यातील, आक्षी, वरसोली, मांडवा, रेवस परिसरात येण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर बाब लक्षात घेऊन किनारपट्टीवरील भागात गस्त वाढविण्यात आली. सर्व सागरी पोलीस ठाण्यांना इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरीकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मत्स्यव्यवसाय विभाग आणि मेरीटाईम बोर्डाला बंदरात येणाऱ्या प्रत्येक बोटीची कसून तपासणी करण्याचे तसेच खलाश्यांची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सागरी सुरक्षा दलांनाही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने कळवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस, तटरक्षक दलांच्या बोटींची गस्तही नियमित सुरु असल्याची माहिती रायगड पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी वाय जे यमगर यांनी दिली.