करोनाच्यादृष्टीने हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात रविवारी  सात नव्या करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. शहर व तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ६३३ झाली असून नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ७८९ वर पोहचली आहे.

सकाळी शहरातील एकूण सात रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यात सहा महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या १०२ अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह असून ९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. याशिवाय नाशिकमधील प्राप्त २० अहवालांपैकी १९ अहवाल निगेटिव्ह आणि एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण सिडको मधील दोन वर्षीय मुलगा आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे नाशिक जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ७८९ झाली आहे.

विलगीकरण केंद्रातून १८ पंखे व ६० एलईडीसह साठ हजाराचा ऐवज लंपास  –

करोना रुग्णांसाठीच्या म्हाळदे घरकुल योजनेतील विलगीकरण केंद्रातून अज्ञातांना अठरा पंखे व साठ एलईडी बल्ब चोरून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या केंद्रात पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे तेथील सर्व रुग्णांना अन्यत्र हलवल्याने पाच दिवसांपासून हे केंद्र बंद पडले आहे. केंद्र बंद असले तरी पालिका प्रशासनाने येथे रखवालीची व्यवस्था केली आहे. १३ मे रोजी रात्री रखवालदाराची नजर चुकवून चोरट्यांनी एका इमारतीमधील अठरा पंखे,साठ एलईडी बल्ब व तारा असा सुमारे साठ हजाराचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार रखवालदाराच्या लक्षात आला. त्यानंतर हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.