राज्यात करोनाचा संसर्ग थांबवण्याचं नाव घेत नसताना ‘सारी’च्या आजारानंही डोकं वर काढलं आहे. औरंगाबादमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण असून, त्यापाठोपाठ राज्यातील इतर भागातही ‘सारी’चे रुग्ण आढळून येत आहे. सातारा जिल्ह्यात ‘सारी’ सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं आरोग्य विभागानं काहीजणांची तपासणी केली. यात त्यांना सारी ऐवजी करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

राज्यात औरंगाबाद शहरात करोनाबरोबरच ‘सारी’च्या आजारानं हातपाय पसरले आहेत. आतापर्यंत तीन जणांना सारीमुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सारीच्या आजारामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं अधिकाधिक तपासण्या करण्याची सूचना केली आहे. सातारा जिल्ह्यातील सात जणांना ‘सारी’ सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं आरोग्य प्रशासनानं त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे या सातपैकी चार जणांनी कुठेही प्रवास केला नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मुंबई पुण्याबरोबच इतर शहरातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढत चालला आहे. वाढत्या आकड्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असून, रविवारी सकाळी यात भर पडली आहे. १३४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १८९५ इतका झाला आहे. तर दुसरीकडं करोनाबरोबरच सारीला रोखण्याचं आव्हान समोर उभं ठाकलं आहे. दरम्यान, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.