सर्वसामान्यांना करोनासंबंधी माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारकडून एक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. करोनासंबंधी माहिती देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटबोट ही सुविधा राज्य सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने +912026127394 हा क्रमांक दिला आहे. हा क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा. या ग्रुपमध्ये आल्यानंतर करोनासंबंधी आपल्या मनातील जे प्रश्न, शंका असतील त्यांची माहिती मिळेल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. सध्या ही सुविधा इंग्रजीत असून मराठीत आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करु असंही यावेळी ते म्हणाले.

“याआधी संवाद साधताना सर्व सूचना मी व्यवस्थित दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनीही तुमच्याशी संवाद साधला. त्यांनी अत्यंत गांभीर्याने निवेदन दिलं. हे निवेदन ऐकल्यानंतर मी पण थोडा वेळ चरकलो. लॉकडाउन, घराबाहेर पडायचं नाही ही गोष्ट कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारी आहे. साहजिकच आहे माझ्या मनात पुढे काय करायचं याची भीती आणि शंका निर्माण झाली. पण मी काही वेळानंतर पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की तुम्ही दिलेल्या सूचना आम्ही आधीच राज्यात दिल्या आहेत. आम्ही लॉकडाउन केलं आहे. पण अत्यावश्यक सेवा आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी आपल्याला ठेवाले लागतील अन्य़था गोंधळ निर्माण होईल,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“अनेक दुकानांमध्ये झुंबड उडाल्याचं कळत आहे. गैरसमज करुन घेऊ नका अशी विनंती आहे. मोदींनी मला युरोपमध्ये काय संकट निर्माण झालं आहे याची कल्पना दिली. ते वातावरण आणि परिस्थिती आपल्याकडे होऊ नये यासाठी काळजीपूर्वक पाऊलं उचलत आहोत. गैरसमज करुन घेऊ नका अशी विनंती आहे. कोणत्याही परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू सुविधा बंद केल्या जाणार नाहीत,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

“त्याच्यामुळे कोणीही गोंधळून जाऊ नका. जीवनाश्यक सेवा सुविधा कधीच बंद होणार नाही. पण संकट अतिशय गंभीर आहे. त्याचं गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका. या रोगापासून वाचण्याचा हाच उपाय आहे. घराबाहेर पाऊल टाकलं तर संकट घरात पाऊल टाकेल. घाबरु नका, पण काळजी घ्या,” अशी विनंती उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

“आपण हे सगळं संकटातून बाहेर पडण्यासाठी करत आहोत. दुकानांमध्ये गर्दी करु नका, घाबरु नका. धान्याचा पुरेसा साठा आहे. घऱी उगाच साठा करु नका. संकटाची भीती मात्र दूर होऊ देऊ नका,” असंही यावेळी ते म्हणाले.