पुढील १५ दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवताना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व  विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “विषाणूंच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किट्स, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता याकडे लक्ष द्यावे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्या प्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घेण्यात यावे”.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तुटवडा भासू नये यासाठी आशा, अंगणावडी सेविका, होमगार्ड्स यांना वैद्यकीय प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री, उद्योगमंत्री यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिवदेखील होते. संपूर्ण राज्याचा आढावा घेतला. जर वैद्यकीय क्षेत्रात अधिक स्टाफची गरज लागली तर आशा, अंगणावडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. काही ठिकाणी याची सुरुवात देखील करण्यात आली आहे”.