राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराता आज करोनाने आणखी एक बळी घेतला आहे. शहरातील किलेअर्क भागातील एका 60 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. या महिलेवर घाटी रुग्णालयता उपचार सुरू होते. 25 एप्रिल रोजी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. करोनामुळे आतापर्यंत शहरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे या रुग्णास घाटीत 25 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. 25 एप्रिल रोजीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला व त्याच दिवशी त्यांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटीतील उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्या आता पन्नाशीच्या पुढे गेली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास आणखी दोन जणांचे अहवाल करोना चाचणीला सकारात्मक आले. समतानगर आणि असेफिया कॉलनी या भागातील दोघी जणींना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण समतानगर भागात सापडले असून या भागात आता नऊ रुग्ण झाले आहेत.

गेल्या आठवडय़ापासून शहरातील विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. भावसिंगपुरा भागातील भीमनगर भागातील एका महिलेच्या मृत्यूनंतर करोना चाचणी सकारात्मक आली होती. या महिलेच्या अंत्ययात्रेस १०० हून अधिक जणांची गर्दी होती. त्यामुळे अनेक जणांच्या मनात भीती होती. मात्र, रविवारी पहाटे समतानगर आणि असेफिया कॉलनीतील दोन महिलांची चाचणी सकारात्मक आली. किलेअर्क परिसरातही शनिवारी करोनारुग्ण आढळल्याने प्रशासन हैराण झाले होते.

शहरातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, त्या भागात टाळेबंदी अधिक  कडक करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अडचणींबाबतही त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडे पीपीई कीटची मागणी अधिकाऱ्यांनी नोंदवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.