करोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी पुकारण्यात आली असताना नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अफवा फैलावण्याचे प्रकार सोलापुरात घडत आहेत. दोन दिवसापूर्वी अफवा फैलावता एका डॉक्टरच सापडला होता. त्यानंतर आता आणखी चौघांजणावर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असताना रस्त्यावर कायदा हातात घेऊन मोकाट फिरणा-या व्यक्तींना पकडून त्यांच्या कपाळावर ६० दिवस पुसला जाणार नाही, असा शिक्का मारला जाणार आहे. ही ठोस कारवाई शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार होणार आहे, असा मजकूर समाज माध्यमातून प्रसारीत झाला आहे. या मजकुरासोबत कपाळावर मारावयाचा लाल रंगाचा गोल शिक्काही प्रसिध्द करण्यात आला आहे. ही माहिती संपूर्णपणे खोटी असून असा कोणत्याही प्रकारचा आदेश पोलीस आयुक्त शिंदे यांनी दिला नाही. परंतु केवळ नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्यासाठी ही खोटी माहिती समाज माध्यमातून प्रसारीत करून अफवा फैलावण्यात आली आहे.

या प्रकरणाची दखल घेऊन अमर ज्ञानदेव पवार (जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर), लक्ष्मण बाबुराव गायकवाड, विक्रम रामचंद्र वाडे व सुरेश सिद्राम पाटुळे (तिघे रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) या चौघांविरूध्द भारतीय दंड विधान कलम १८८, ३४ व आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर अफवा फैलावण्याचे प्रकार घडत आहेत. यात आतापर्यंत चार गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. यात यू ट्यूबवरील दोन खासगी वृत्तवाहिनींसह एका डॉक्टरवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.