करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा व सामान्यांची उडालेली तारांबळ पाहून महिला बचतगटांनी पूढाकार घेत तब्बल १५ हजार मास्कचा पूरवठा करीत सामान्यांना दिलासा दिल्याचे उदाहरण पूढे आले आहे.

राज्यात विविध कौशल्यामूळे अव्वल ठरलेल्या वर्धा जिल्ह्यातील ग्रामोन्नती अभियानाच्या ‘उमेद’ उपक्रमात १३ हजार बचतगट कार्यरत आहे. याचवर्षी एका गटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. करोनाचे संकट खेडोपाडी पोहोचू लागल्यावर गावकरी खबरदारी म्हणून मास्कची मागणी करू लागले. पण त्याचाही तुटवडा व जे उपलब्ध होत होते ते देखील चढ्या दराने मिळू लागल्याने चिंतेत पडलेल्या गावकऱ्यांचे चेहरे पाहून काही गटांनी प्रशासनाशी संपर्क साधला.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी त्वरीत मास्क तयार करण्याची परवानगी दिली.

उमेदच्या व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांनी काही गटांना मार्गदर्शन करीत खादी ग्रामोद्योगचे कापड उपलब्ध करून दिले. सेवाग्राम, सेलू, धानोली मेघे, येळाकेळी, कारंजा, शेडगाव, रोहणा, सिंदी मेघे, सिरस गाव, अल्लीपूर व अन्य पन्नास गावातील महिला घरच्या शिवणयंत्रावर कामाला लागल्या. माफक दरात हे मास्क ग्रामपंचाय पातळीवर उपलब्ध करून देण्यात आले.

प्रकल्प संचालक सत्यजित बडे म्हणाले, प्रतिदिन पाच हजार मास्क तयार करण्याची क्षमता आहे. मात्र कापडाचा तुटवडा असल्याने अपेक्षित उत्पादन होत नाही. कापड मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.  या महिलांनी गत दहा दिवसात १४ हजार ५०० मास्क तयार करून पूरविले आहेत. यासोबतच काही गटांनी हॅण्डवॉशची गरज लक्षात घेवून सेंद्रीय पध्दतीने द्रावण तयार केले. येरंडी व नारळतेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, पाणी व बकरीचे दुध याचे मिश्रण एकजीव करीत गरम केल्या जाते. थंड झाल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरण्याचे काम या महिला करतात. पाचशे लिटरचा पुरवठा करण्यात आला असून वर्धा नगर परिषदेने मोठी खरेदी केली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याची प्रतिक्रिया आहे. मास्कसुध्दा निर्जतूकीकरण करून पाठविल्या जाता आहेत.