करोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य मंत्र्यालय आणि डॉक्टर आणि नर्सेसचेची सुळे यांनी कौतुक केलं आहे. ट्विटरवरुन त्यांनी ट्विट करत या संकटाचा समान करणाऱ्या सरकारी यंत्रणेचे कौतुक करतानाच याची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.

सुळे यांनी यासंदर्भात दोन ट्विट केले आहेत. “कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी झटणारे डॉक्टर्स,नर्स,रुग्णालयांचा इतर स्टाफ यांचे कौतुक. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य मंत्रालय ही परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळत आहेत. त्यांचा अभिमान वाटतो,” असं सुळे यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये सुळे यांनी पोलीस, सरकारी अधिकारी आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं आहे. “याशिवाय पोलीस, सरकारी अधिकारी, एअरपोर्ट व सार्वजनिक स्थळी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार. आपण सर्वजण आमचे खरे हिरो आहात.आपण एकत्रिपणे या संकटाचा सामना करु आणि हि लढाई नक्की जिंकू,” असं त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यामधील करोनाच्या संसर्गासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री मागील काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेत आहेत. करोनाग्रस्तांची आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची सर्व माहिती वेळोवेळी सामान्य जनतेपर्यंत पत्रकार परिषद, सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहचवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मागील काही दिवसांमध्ये अनेकदा पत्रकारांशी संवाद सादला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या मदतीने जनतेने घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार करोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या उपाययोजनांबद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी समाधान व्यक्त केल्याचे पहायला मिळत आहे.